
डेक्कन परिसरातील एका कॅफेमध्ये तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेली प्रसिद्ध रीलस्टार माधवी कुंभार हिला अखेर न्यायालयाने दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तक्रारदाराशी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क न साधणे आणि पुराव्यांशी छेडछाड न करणे, या कडक अटींवर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

बचाव पक्षाचा न्यायालयात युक्तिवाद

या प्रकरणात माधवी कुंभारच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. रणजितसिंह धुमाळ आणि ॲड. विष्णू होगे यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने विविध कायदेशीर मुद्दे मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ६१(२) आणि २३८(ब) सह शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियम व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टनुसार गुन्हे दाखल आहेत.

नेमकं काय घडलं होतं?
१५ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वातीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास डेक्कन परिसरातील एका कॅफेमध्ये ही घटना घडली होती. आंबेगाव परिसरात राहणारा अथर्व जगताप (वय १९) हा तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवी आणि तिच्या टोळीने पूर्वनियोजित कट रचून अथर्वला कॅफेमध्ये घेरले आणि त्याच्यावर कोयत्याने वार केले. यातील एक गंभीर वार त्याच्या मानेवर करण्यात आला होता.
प्रकरणात एकूण सात जणांना अटक
या हत्येच्या प्रयत्न प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात जणांना अटक केली होती:
माधवी कुंभार (वय २३) व स्नेहल संजय सोनके (वय २०) (दोघी रा. काळेपडळ, हडपसर)
राहुल वाघमारे (वय २०) व शिवानंद तलवार (वय २१) (दोघे रा. पिंपळे गुरव)
आदित्य भालेराव (वय २२) व प्रियांश भोसले (वय २२) (दोघे रा. औंध)
प्रेम साळवे (वय २२) (रा. बोपोडी)
सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रीलस्टार माधवी कुंभारला जामीन मिळाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

