
‘MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करा’; रोहित पवारांचा इशारा, ५० हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरणार!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांवरून राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी धडक आणि स्वच्छ प्रतिमेचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची MPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी,अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.

पुण्यात ५० हजार विद्यार्थी आंदोलन करणार

रोहित पवार यांनी गट-ब (Group-B), पीएसआय (PSI) आणि कृषी विभागाच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या गंभीर आक्षेपांकडे लक्ष वेधले. “परीक्षेचा पॅटर्न आधीच फुटत असेल, तर प्रामाणिकपणे दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर हा घोर अन्याय आहे. पुढील तीन दिवसांत यावर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पुण्यात तब्बल ५० हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि या आंदोलनाचा वणवा राज्यभर पसरेल,” असा इशारा त्यांनी दिला.

खाजगी कंपन्यांना नियमबाह्य कंत्राटे अन् कोट्यवधींचा गैरव्यवहार?
ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर जोरदार हल्लाबोल करताना रोहित पवार म्हणाले की, परीक्षांच्या नावाखाली खाजगी कंपन्यांना नियमबाह्य कामे दिली जात असून यामध्ये कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. “विवेक भीमनवार आरटीओ आयुक्त असताना त्यांच्या काळात नेमकी कोणाकोणाला कंत्राटे देण्यात आली, याची संपूर्ण माहिती मी पुराव्यांसह मागवणार आहे. या प्रकरणात भीमनवार यांच्यासह अनेक बडे अधिकारी आणि सत्ताधारी पक्षातील मंत्री अडचणीत येतील,” असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. यासोबतच कृषी विभागाच्या आकृतिबंधावर सरकारने घेतलेल्या निर्णयावरही त्यांनी जोरदार टीका केली.

