Latest Marathi News
Ganesh J GIF

एक वडापाव १५ हजार रुपयांना!; दिल्लीच्या तरुणीची ‘ओजी’ वडापाव खाण्यासाठी थेट मुंबईत धाव

वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण! पण आवडीचा आणि अस्सल ‘ओजी’ वडापाव खाण्यासाठी नक्की कोण काय करू शकतं? एका तरुणीने फक्त अस्सल मुंबईचा वडापाव खाण्यासाठी जे केलं, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या तरुणीला एक वडापाव तब्बल १५ हजार रुपयांना पडला असून, तिने स्वतः इन्स्टाग्रामवर रील शेअर करत या अनोख्या प्रवासाची माहिती दिली आहे.

दिल्लीतील चव आवडली नाही अन् घेतला मुंबईचा ध्यास

इन्स्टाग्रामवर ‘विटी स्पेस’ (Witty Space) नावाचे अकाऊंट चालवणाऱ्या या तरुणीने दिल्लीत वडापाव खाल्ला, पण तिला त्याची चव अजिबात आवडली नाही. खरीखुरी आणि अस्सल चव फक्त मुंबईतच मिळू शकते या खात्रीने तिने अजिबात वेळ न घालवता थेट ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ म्हणजेच मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला.

१५ हजार रुपयांचा प्रवास कसा झाला?

टॅक्सीने जात असतानाच तिने दिल्ली ते मुंबईचे ५ हजार रुपयांचे विमानाचे तिकीट बुक केले. प्रवासादरम्यानचे तिचा खर्च असा झाला:

विमान तिकीट: ₹५,०००

एअरपोर्टवर चहा: ₹१६५

विमानात नूडल्स: ₹३०० (भूक लागल्याने खाल्लेल्या कप नूडल्स)

हॉटेल मुक्काम: ₹४,००० (मुंबईतील ट्रॅफिकमुळे पहिल्या दिवशी वडापाव खाणे शक्य न झाल्याने एका रात्रीचे हॉटेल भाडे)

इतर प्रवास आणि वाहतूक खर्च: उर्वरित रक्कम

दुसऱ्या दिवशी सकाळी तिने ऑनलाईन ऑर्डर न करता रस्त्यावरील गाडी शोधली आणि अखेर तिला २० रुपयांचा वडापाव मिळाला.

‘हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वडापाव!’

गाडीवरचा तो २० रुपयांचा वडापाव खाल्ल्यानंतर तिचे मन तृप्त झाले. “पहिला घास घेताच मला जाणवले की खरोखरच मुंबईतच सर्वोत्तम वडापाव मिळतो. वेळ आणि पैसा खर्च केल्यानंतर मी ठामपणे सांगू शकते की, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वडापाव होता,” असे तिने या रीलमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या रीलवर सोशल मीडियावर दोन गट पडले असून, एका गटाने तिचे वडापाववरील प्रेम पाहून कौतुक केले आहे, तर दुसऱ्या गटाने याला पैशांची उधळपट्टी आणि पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!