
देशभरात सध्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR – Special Intensive Revision) अंतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेनंतर अनेक राज्यांत मसुदा (Draft) यादी प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिक आपले नाव शोधण्यात व्यस्त आहेत. अशातच झारखंडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या ड्राफ्ट मतदार यादीत तब्बल तीन अफगाणिस्तानी नागरिकांची नावे आढळल्याने खळबळ उडाली आहे.

बीएलओच्या सतर्कतेमुळे उघड झाला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २८६ वर अनुक्रमे ३०, ३१ आणि ३३ या क्रमांकावर आसिल खान, मोहम्मद असलम आणि मोहम्मद इब्राहिम या तिघांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली होती. या तिघांनी ‘SIR’ची इन्युमरेशन प्रक्रिया पूर्ण केली होती आणि त्यांची नावे ड्राफ्ट लिस्टमध्येही झळकली होती.

मात्र, कागदपत्रांच्या अंतिम पडताळणीदरम्यान बीएलओला (BLO) संशय आला. बीएलओने तत्काळ या तिघांना नोटीस बजावून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यांनी कोणतीही कागदपत्रे जमा केली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी व प्रशासनाने त्यांच्या पासपोर्टची चौकशी केली असता, हे तिघेही अफगाणिस्तानचे नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.
निवडणूक आयोगाकडून कठोर चौकशीचे आदेश
या गंभीर प्रकाराची दखल घेत झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी रवी कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आयटी विभागाशी चर्चा करून त्यांनी सांगितले की, “तीन परदेशी नागरिकांची ओळख पटली असून, त्यापैकी एकाच्या परदेशी नागरिकत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे तर दोघे संशयित आहेत. या तिघांचीही नावे मतदार यादीतून तात्काळ वगळण्यात आली आहेत.”
सहभागी असणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार
निवडणूक आयोगाने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. या परदेशी नागरिकांना भारतीय मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कोणी आणि कशी मदत केली? यामागे कोणते रॅकेट आहे का? याची सखोल चौकशी केली जात आहे. हा एक गंभीर गुन्हेगारी प्रकार असून यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच या तिघांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची आणि त्यांच्या कागदपत्रांचीही कसून चौकशी केली जात आहे.

