
शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील बालकांसाठी विशेष मोहीम; दरमहा मिळणार २५५० रुपये, अदिती तटकरेंचे मोठे निर्देश
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील सर्व पात्र बालकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात संबंधित जिल्हा प्रशासनाला सक्त निर्देश दिले आहेत. मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बालसंगोपन योजनेअंतर्गत दरमहा २,५५० रुपयांची मदत

सध्या या १९ जिल्ह्यांतील १ हजार ५९३ बालकांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा’, तर १३३ बालकांना केंद्राच्या ‘स्पॉन्सरशिप योजनेचा’ लाभ दिला जात आहे. योजनेच्या उद्देशावर बोलताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, कुठल्याही आर्थिक वा प्रतिकूल परिस्थितीमुळे मुलाला कुटुंबापासून दूर जाऊन बालगृहात राहावे लागू नये, हेच या योजनेचे मूळ ध्येय आहे. या योजनेंतर्गत पात्र बालकाच्या संगोपनासाठी दरमहा २ हजार ५५० रुपयांचे थेट अनुदान दिले जाते. सध्या राज्यभरात सुमारे १ लाख ६० हजार बालके याचा लाभ घेत आहेत.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांचा ‘एकल महिला धोरणात’ समावेश
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या कुटुंबांतील महिलांचा समावेश आता ‘एकल महिला धोरणात’ केला जाणार आहे. यामुळे या महिलांना एकाच छताखाली शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळणार असल्याची घोषणा अदिती तटकरे यांनी केली.
प्रशासनाला समन्वयाचे निर्देश
तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसांत उत्तम समन्वय ठेवून काम करावे, असे प्रतिपादन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना किंवा केंद्राच्या स्पॉन्सरशिप योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी आणि कुटुंबांनी तातडीने आपल्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे.

