Latest Marathi News
Ganesh J GIF

“सरकारला मनोज जरांगेंना मारायचंय!”; संजय राऊतांचा सरकारवर सनसनाटी आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे. गेल्या १२ दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण न गेल्यामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली असून शरीरातील शुगरची पातळी चिंताजनकरीत्या कमी झाली आहे. तरीही ते मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे मिळण्याच्या मागणीवर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर, जरांगे पाटलांच्या बिघडत्या प्रकृतीवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले आहेत.

“सरकारसाठी जरांगेंचा उपयोग संपला” – संजय राऊत

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. राऊत म्हणाले, “सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचं आहे. त्यांची लढाई आणि संघर्ष हा सरकारच्या गळ्याचा फास बनला आहे. राज्य सरकारच्या दृष्टीने आता जरांगे पाटील यांचा उपयोग संपलेला आहे. सरकारने त्यांच्या आंदोलनाचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. उपोषणाचा १२ वा दिवस उजाडूनही तोडगा निघत नसल्याने, “जरांगेंना अशा अवस्थेत सोडणे हे अत्यंत अमानुष आहे,” असेही राऊत पुढे म्हणाले.

विखे-पाटील काय म्हणाले?

दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडली होती. विखे-पाटील म्हणाले होते की, “मराठा समाजाच्या व्यापक हितासाठी सरकारने जे आवश्यक निर्णय घ्यायचे होते, ते घेतलेले आहेत आणि त्यांची अंमलबजावणीही सुरू आहे. तरीही त्या निर्णयांवर जरांगे पाटलांचे समाधान होत नसेल आणि ते आंदोलनावर ठाम राहत असतील, तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.”

राजकारणात तापले वातावरण

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकीकडे उपोषणामुळे मनोज जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस अधिक नाजूक होत चालली आहे, तर दुसरीकडे यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!