
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आर-पारच्या लढाईचा निर्णय घेतला आहे. उपोषणाचा १४ वा दिवस उजाडला तरी शासनाकडून सकारात्मक तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईला धडक देण्याची तयारी पूर्ण केली आहे. उद्या (शनिवारी) अंतरवली सराटीत होणाऱ्या मराठा समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मनोज जरांगे मुंबईत कूच करण्याची तारीख जाहीर करणार आहेत.

जालना ते मुंबई खास ‘मीडिया व्हॅन’ आणि गाड्यांचे ताफे सज्ज

जरांगे पाटलांच्या मुंबई मोहिमेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने अभूतपूर्व तयारी करण्यात आली आहे. जालना ते मुंबई या प्रवासादरम्यान संवादासाठी आणि आंदोलनाच्या माहितीसाठी एक विशेष ‘मीडिया व्हॅन’ तयार करण्यात आली आहे. या व्हॅनमधूनच मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होतील. त्यांच्यासोबत हजारो वाहनांचा ताफा आणि लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. येत्या सोमवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने, सणांच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील नेमकी कोणती तारीख जाहीर करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आधी बैठक, मगच आर-पारचा निर्णय!
अंतरवली सराटीत उद्या सकाळी मराठा समाजाची आणि समन्वयकांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुंबई आंदोलनाची अंतिम रूपरेषा ठरवली जाईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील आपली पुढची भूमिका स्पष्ट करतील.
प्रकृती खालावली; रात्री उशिरा सलाईन आणि वैद्यकीय उपचार
सततच्या १४ दिवसांच्या आमरण उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. गुरुवारी रात्री उशिरा वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले असून त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. तसेच त्यांच्या रक्तदाबाची (BP) आणि साखरेची (Sugar) तपासणी करण्यात आली. प्रकृती साथ देत नसतानाही जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
धाराशिवमध्ये मध्यरात्री महामार्ग रोखला; वाहतूक २ तास ठप्प
जरांगे यांच्या उपोषणाचा पाठपुरावा आणि सरकारच्या टाळाटाळ धोरणाचा निषेध म्हणून धाराशिवमध्ये आंदोलक आक्रमक झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता लातूर-पुणे महामार्गावरील तेरणा नदीच्या पुलावर लाकडे पेटवून आंदोलकांनी ‘रास्ता रोको’ केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि सुमारे दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

