
मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणावरून मराठवाड्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील हे १२ सप्टेंबर रोजी मुंबई आंदोलनाची घोषणा करण्याच्या तयारीत असतानाच, अवघ्या १ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडीगोद्री गावातून ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी जरांगे आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक चौथी नापास माणूस काहीही मागण्या करतो आणि शासन लाचारीने त्यावर जीआर (GR) काढते. मनोज जरांगेंचे आंदोलन पहिल्या दिवसापासून बेकायदेशीर आहे, असा थेट आरोप प्रा. हाके यांनी केला.

“सलाईन लावून कसले उपोषण? कायद्याचा धाक उरला नाही”

जरांगे यांच्या उपोषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लक्ष्मण हाके म्हणाले, “रोज सलाईन लावून कसले उपोषण चालते? हे आंदोलन पहिल्या दिवसापासून संविधानाला न मानणारे आहे. जे लोकशाही आणि प्रशासनाचा सन्मान करत नाहीत, ते अंतरवालीत राहिले काय किंवा मुंबईत गेले काय, त्याने काहीही फरक पडत नाही.”

‘सरसकट कुणबी प्रमाणपत्रांची खिरापत; ओबीसींचे आरक्षण धोक्यात’
राज्य सरकारच्या धोरणावर संतप्त होत हाके म्हणाले, “जिल्ह्या-जिल्ह्यांत विशेष शिबिरे लावून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. त्यांना मागच्या दाराने ओबीसी प्रवर्गात घुसवून आमच्या हक्काचा वाटा हिरावला जात आहे. शेती करणारा प्रत्येक घटक कुणबी होऊ शकत नाही, उद्या मारवाडी किंवा ब्राह्मण समाजही आरक्षणाची मागणी करेल. दोन्ही मराठा व ओबीसी उपसमित्यांची संयुक्त बैठक लावून शासनाने समोरासमोर चर्चा घडवून आणावी.”
गेवराईत ओबीसींच्या वाहनावर दगडफेक; SIT चौकशीचे काय झाले?
पत्रकार परिषदेत कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवताना हाकेंनी गंभीर आरोप केला. “गेवराई तालुक्यात ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाडीवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. अंतरवालीत महिला पोलिसांवर हल्ला आणि नेत्यांची घरे जाळणाऱ्यांवर स्थापन झालेल्या SIT चौकशीचे पुढे काय झाले? सामान्य माणसावर लगेच कारवाई करणारे सरकार जरांगेंना साधे समन्सही बजावू शकत नाही,” असा सवाल त्यांनी केला.
राजकीय नेत्यांवर प्रहार; विखे पाटील अन् नारायण कुचेंवर आगपाखड
सत्ताधारी आणि विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढताना हाके म्हणाले मध्यस्थी करताना विखे पाटलांनी आपली विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे. आमदार नारायण कुचे यांच्यासह ज्या लोकप्रतिनिधींनी बेकायदेशीर दबावाला लाचारीने पाठिंबा दिला आहे, त्यांच्या घरांसमोर ओबीसी समाज तीव्र निदर्शने करेल आणि येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल.
“एका आंदोलकाच्या हट्टापायी महाराष्ट्र पेटवू नका”
शेवटी महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा देत लक्ष्मण हाके म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागास घटकांसाठी तयार केलेल्या ताटात आज प्रस्थापितांकडून माती कालवण्याचे काम सुरू आहे. सरकारने राज्यातील भीषण दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांसारख्या मूळ प्रश्नांकडे लक्ष द्यावे. एका आंदोलकाच्या हट्टापायी ओबीसींच्या अस्तित्वावर गदा आणल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल.”

