
मंत्र-तंत्राने ‘१५ कोटींच्या नोटांचा पाऊस’!; मुंबईतील निवृत्त कर्मचाऱ्याला ११ लाखांचा गंडा,नाशिकमध्ये भोंदूबाबाला बेड्या
पैशांचा पाऊस पाडण्याचे आणि गुप्तधन मिळवून देण्याचे अघोरी दावे करून नागरिकांना लुटणाऱ्या भोंदूबाबांचा उच्छाद अजूनही सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, मंत्र-तंत्राच्या पूजेद्वारे तब्बल १५ कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुंबई महापालिकेच्या (BMC) एका निवृत्त कर्मचाऱ्याची ११ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अभोणा पोलिसांनी मुख्य भोंदूबाबासह चौघांना अटक केली आहे, तर तिघे साथीदार अद्याप फरार आहेत. हिराचंद शिवाजी बर्डे (रा. पिंपळे खुर्द, ता. कळवण, जि. नाशिक) असे बेड्या ठोकण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या (ANIS) तत्परतेमुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

असा रचला जादूटोण्याचा आणि फसवणुकीचा बनाव

मुंबईतील बोरिवली येथे राहणारे निवृत्त कर्मचारी राजाराम सीताराम शेलार (वय ६५) यांची एका मध्यस्थाद्वारे भोंदू हिराचंद बर्डेशी ओळख झाली होती. सुरुवातीला १ हजार रुपये घेऊन भोंदूने पूजा केली आणि बनावट पद्धतीने २ लाख रुपयांचा पाऊस पाडल्याचे दाखवून शेलार यांचा विश्वास संपादन केला.
पुढे शेलार यांच्या हातात तांदूळ, अगरबत्ती व नारळ देऊन मंत्र म्हणत भोंदूने नारळात अचानक स्फोट घडवून आणला आणि अघोरी शक्तींचा चमत्कार झाल्याचा भास निर्माण केला.५ जणांनी प्रत्येकी ११ लाख रुपये दिल्यास १५ कोटींचा पाऊस पाडेन,” असे सांगून शेलार यांच्याकडून वेळोवेळी १० लाख ९५ हजार रुपये उकळले.
गोणीत निघाल्या खेळण्यातील खोट्या नोटा; गायब करण्याची धमकी!
काही दिवसांनी भोंदूने शेलार यांच्या हातात ३ कोटी रुपयांचा पाऊस पडल्याचे सांगून नोटांनी भरलेली एक गोणी दिली. “ही गोणी ७ दिवस उघडू नका, नाहीतर देवाचा कोप होईल,” अशी भीती घातली. दरम्यान, शेलार यांच्या काकूंचे निधन झाल्याने पूजा खंडित झाल्याचे सांगत भोंदूने ‘शुद्धीकरणाच्या’ नावाखाली पुन्हा काही लाख रुपये उकळले.
संशय आल्याने शेलार यांनी जेव्हा ती गोणी उघडून पाहिली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बंडलमध्ये वरची फक्त एकच नोट खरी होती, तर आत सर्व खेळण्यातील खोट्या नोटा भरल्या होत्या. शेलार यांनी पैसे परत मागितले असता, भोंदूने त्यांना जादूटोण्याने गायब करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
‘अंनिस’चा पुढाकार; अभोणा पोलिसांकडून ७ जणांवर गुन्हे दाखल
फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच शेलार यांनी ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गौराणे आणि राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. अंनिसच्या मदतीने त्यांनी अभोणा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी तात्काळ सूत्रे हलवत भोंदू हिराचंद बर्डेसह चौघांना अटक केली. या प्रकरणात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यासह (अंनिस कायदा) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार एकूण ७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

