
छत्रपती संभाजी नगरमधील हर्सूल येथे लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून २२ वर्षीय शेख मोहम्मद फैसलची मेडिकल दुकानात शिरून चाकू भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सावंगी-फुलंब्री परिसरातून ९ तासांत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरमधील हर्सूल परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या पूर्ववैमनस्यातून एका २२ वर्षीय सुशिक्षित तरुणाची त्याच्याच मेडिकल दुकानात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ महिन्यांपूर्वी मुख्य आरोपी रेहानच्या कुटुंबाने फैसलच्या धाकट्या बहिणीसाठी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, बहिणीचे लग्न आधीच ठरले असल्याने फैसलच्या कुटुंबाने हा प्रस्ताव नाकारला. याच गोष्टीचा राग मनात धरून गुंड प्रवृत्तीचा रेहान फैसल आणि त्याच्या कुटुंबाला सतत त्रास देत होता.शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास फैसल आपल्या मेडिकल दुकानात शांतपणे कुराण पठण करत बसला होता. तितक्यात आरोपी रेहान आणि त्याचा साथीदार समीर दुकानात शिरले. त्यांनी फैसलला मारहाण करत दुकानाबाहेर ओढले आणि रेहानने धारदार चाकू फैसलच्या पोटात खोलवर भोसकला. वार इतका भीषण होता की, चाकू पोटातच सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

गंभीर जखमी झालेल्या फैसलला स्थानिक नागरिकांनी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.हर्सूल पोलीस ठाण्याच्या पथकाने कच्ची घाटी, पीरवाडी, रसूलपुरा आणि खुलताबाद परिसरात शोधमोहीम राबवून अवघ्या ९ तासांत मुख्य आरोपी रेहान पटेल आणि त्याचा साथीदार समीर शेख या दोघांना सावंगी-फुलंब्री परिसरातून अटक केली.निष्पाप आणि समंजस मुलगा गमावल्यामुळे फैसलच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


