Latest Marathi News
Ganesh J GIF

रिसोडमध्ये कुख्यात गुन्हेगार रमेश काळेची निर्घृण हत्या; नातेवाईकांनीच मृतदेह फेकला विहिरीत, ५ आरोपींना बेड्या!

जिल्ह्यातील रिसोड शहरानजीक असलेल्या निजामपूर परिसरात एका कुख्यात गुन्हेगाराची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रमेश किसन काळे (वय अंदाजे ४० वर्षे) असे या मृत गुन्हेगाराचे नाव असून, जुन्या वैमनस्यातून त्याच्याच सख्ख्या नातेवाईकांनी हा गेम वाजवल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी रिसोड पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत ५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

रमेश काळेची हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह निजामपूर परिसरातील एका विहिरीत फेकून दिला होता. आज ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

मृत काळेवर दाखल होते २५ हून अधिक गंभीर गुन्हे

मृत रमेश काळे हा रिसोड व परिसरातील एक सराईत आणि कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी आणि दुकानांचे शटर तोडून चोऱ्या करणे,दरोडे टाकणे,रस्त्यावरील लुटालूट करणे यांसारख्या अंदाजे २० ते २५ गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. त्याच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरात त्याची मोठी दहशत होती.

नातेवाईकांनीच मनात धरला होता राग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या अंतर्गत कौटुंबिक वाद आणि जुन्या वैमनस्यातून झाली आहे. रमेश काळेच्याच नात्यातील पाच जणांनी मिळून या हत्येचा पद्धतशीर कट रचला आणि त्याला संपवले.

रिसोड पोलिसांची धडक कारवाई

घटनेचे गांभीर्य ओळखून रिसोड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत संशयित ५ आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी कोठडीत केली. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असून, आरोपींनी हत्येचा नेमका कट कसा रचला आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास रिसोड पोलीस करत आहेतसराईत गुन्हेगाराच्या या रक्तरंजित अंकामुळे सध्या रिसोड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून या घटनेचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!