Latest Marathi News
Ganesh J GIF

नशामुक्त एसटी! आता चालकांची होणार ड्रग्ज तपासणी; परिवहन विभागाचा मोठा निर्णय

एसटी महामंडळाच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन विभागाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. एसटी चालकांच्या मद्यसेवनासोबतच आता ते अमली पदार्थांचे (ड्रग्ज) सेवन करतात का, याचीही तपासणी केली जाणार आहे. ‘नशामुक्त एसटी’ अभियानाच्या माध्यमातून चालकांची नियोजित तसेच अचानक (Surprise Check) तपासणी केली जाईल.

दररोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे चालक कोणत्याही प्रकारच्या नशेखाली गाडी चालवत नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.अमली पदार्थांच्या प्राथमिक तपासासाठी विशेष किटचा राज्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाईल. यात संशय आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई आणि वैद्यकीय चाचणी केली जाईल. तपासणी दरम्यान चालक नशेत आढळल्यास त्याला त्वरित कर्तव्यावरून बाजूला करून पर्यायी चालकाची सोय केली जाईल.केवळ कारवाई न करता व्यसनाधीन चालकांना उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची सुविधा महामंडळाकडून दिली जाणार आहे.

या मोहिमेचा विस्तार केवळ एसटी पुरता मर्यादित न राहता सन २०२६ ते २०२९ या काळात महापालिका बससेवा, खासगी ट्रॅव्हल्स, टॅक्सी, ऑटोरिक्षा, ॲप-आधारित कॅब्स, शाळा-कॉलेजच्या बसेस आणि धोकादायक माल वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांपर्यंत केला जाणार आहे.गृह, आरोग्य, सामाजिक न्याय आणि शिक्षण विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जाणार आहे. या सर्व तपासण्यांची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवली जाणार असून, परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!