
भारताचे ‘अच्छे दिन’चे स्वप्न अजून खूपच दूर…
श्रीलंका पाकिस्तानही भारताच्या पुढे, भारताची अवस्था कशामुळे वाईट
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- अच्छे दिन आल्याचा आणि जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याची कितीही दवंडी पेटवली जात असली तरीही वास्तविक चित्र वेगळे आहे. कारण नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची घसरण झाली असुन भारताची अवस्था खूपच खराब आहे. दक्षिण आशिया देशात अफगाणिस्तान वगळता अन्य सर्व देश भारताच्या पुढे आहेत.
ग्लोबल हंगर इंडेक्स यादीत १२१ देशांच्या यादीत भारत १०७व्या स्थानावर आहे. या यादीमध्ये भारताची अवस्था खूपच वाईट आहे.ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारताला २९.१ इतके गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे भीषण पुर परिस्थिती असलेला पाकिस्तान आणि आर्थिक संकट सापडलेली श्रीलंका देखील भारताच्या पुढे आहेत. गरीब देश म्हणवले जाणारे बांगलादेश, नेपाळ, म्यानमार या सर्व देशांची अवस्था भारतापेक्षा चांगली आहे. भुकेल्या देशाच्या यादेत भारत झाम्बिया, सिएरा लियोन, लायबेरिया, हैती, रिपब्लिक ऑफ कॉन्गो या देशांच्या पंक्तीत पोहोचला आहे. त्यामुळे देश प्रगती करत असला तरीही खरी परिस्थिती मात्र फारच चिंताजनक आहे. भारत आणि इंडिया याच्यातील फरक स्पष्ट करण्यासाठी ही यादी पुरेशी आहे. या यादीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये सर्वात तळाला म्हणजेच १२१व्या स्थानी येमेन हा देश आहे. तर सर्वात वर असणाऱ्या देशांमध्ये चीन आणि कुवेत या आशियायी देशांचा समावेश आहे.
कन्सर्न वर्ल्डवाईड’ आणि ‘वेल्थ हंगर लाईफ’ या संस्थांकडून दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते. त्या देशात उपाशीपोटी राहणाऱ्या लोकांच्या आकडेवारीवरून भूकेची तीव्रता किती आहे, त्यावर त्या देशांचे मूल्यांकन केलं जातं.भारताला या निकषांवर २९.१ इतकं रँकिंग मिळाल्यामुळे भारताची यादीमध्ये घसरण झाल्याचे चित्र आहे.