ट्रॅक्टर चालवताना हे आमदारच चिखलात अडकले
आमदार अधिकाऱ्यांसह चिखलात अडकलेला व्हिडिओ व्हायरल,बघा काय घडल
बीड दि १५ (प्रतिनिधी)- परतीच्या पावसाने बीड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला आहे.आष्टी तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पण या जोरदार पावसाचा दणका आमदार बाळासाहेब आजबे यांनाच बसला आहे. मदत करण्यासाठी निघालेल्या आजबे यांचे ट्रॅक्टर चिखलात अडकले. यामुळे अधिकाऱ्यांसह आमदारांना भर पावसात अडकून पडावे लागले होते.
आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत निघाले होते. पण याच वेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सोलेवाडीतील नदीला पाणी आले.पाणी वाढत जात असल्याने तेथून मार्ग काढत शेतकऱ्यांना भेटीस जाणे शक्य नव्हते. त्यामुळे आजबेंनी ट्रॅक्टरचे स्टेरिंग हाती घेत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतर पार करताच चिखलात ट्रॅक्टर अडकले. जोरदार कोसळणारा पाऊस आणि चिखलात अडकलेले ट्रॅक्टर अशा परिस्थितीत आमदार आणि अधिकाऱ्यांना काही काळ अडकून बसले होते. पण अखेर आजबे यांनीच पावसातून मार्ग काढत सगळ्यांची सुटका केली.

परतीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपून काढले आहे. शेतकऱ्यांचे हातचे पीक गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी पाहणी दाैरे करत आहेत.पण आमदार आजबेंवर भर पावसात अडकून पडण्याची वेळ आली. पण आमदारांनी आपले कसब दाखवत ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढला. त्यानंतर अधिकाऱ्यांसह ते पुढील पाहणीसाठी निघून गेले.