ठाकरे कुटुंबियांकडून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन
गोमुत्र शिंपडल्यामुळे नवा वाद, शिंदे गटाचा ठाकरे गटावर हा गंभीर आरोप
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने आज बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांनी शिवाजी पार्कवर हजेरी लावली. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेही यावेळी उपस्थित होत्या. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. यावेळी अनेक नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. तर गोमु्त्र शिंपडल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे सर्वात मोठी फुट पडली आहे. त्यानंतरचा बाळासाहेबांचा हा पहिलाच स्मृतीदिन आहे. पण आज स्मृतिस्थळावर संघर्ष टाळण्याचा प्रयत्न शिंदे गटानं केला. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे कालच स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. तर शिंदे समर्थक तिथून जाताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यांनी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केले. दरम्यान बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, लढता लढता शिवसेना प्रमुखांनानंतर १० वर्ष निघून गेली. त्यांच्यात जे अनेक पैलू होते त्याचं दर्शन घडवणारा एक अनुभव देणारा स्मारक उभं राहणार आहे. शिवसेना प्रमुख व्यंगचित्रकर ही ओळख ओघाने आलीच. आज ही इतर व्यंगचित्रंकारांनी काढलेली आहेत. ही चित्र उपलब्ध झाली पाहिजेत. काही जणांचे उमाळ आता बाहेर आलेली आहेत. भावना व्यक्त करताना त्याचा बाजार होऊ नये हेच माझं मत आहे. असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे. गोमुत्र शिंपडण्याच्या कृतीवर बोलताना ते म्हणाले की, ज्यांचं तोतये हिंदुत्त्व आहे त्यांनी बोलू नये. त्यांचा मंत्री पण महिलांबद्दल उलटं सुलट बोलत आहेत ते बाळासाहेबांचे कसले विचार बोलतात, असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.तर फडणवीसांना मुख्यमंत्री एैवजी उपमुख्यमंत्री करुन दिल्लीश्वरांनी बदला घेतला असा टोला लगावला आहे.
दरम्यान स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याला शिंदे गटाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटांच्या नेत्यांनी दोन गटात वाद निर्माण करण्याच्या हेतूने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्र शिंपडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, राज्याचे इतर मंत्री तसेच आमदार यांचा हेतुपुरस्कृत अपमान केल्याचा आरोप, शिंदे गटाचे नेते गिरीश धानुरकर यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.