राज्यपाल कोश्यारींविरोधात पुण्यात थेट बक्षीसाचे बॅनर
पुण्यात राष्ट्रवादीची बॅनरबाजी, मजकुरामुळे वाद वाढण्याची चिन्हे
पुणे दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नेहमी चर्चेत असतात. काल औरंगाबादमधील विद्यापीठातील कार्यक्रमात त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापची लाट उसळली आहे. अशातच पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात एक बॅनर लावले आहे यातील मजकुरामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप शशिकांत काळे यांनी शहरात फ्लेक्स लावून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध नोंदविला आहे. काळे यांनी लावलेल्या फ्लेक्सवर म्हटले आहे की,”आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते, आहेत आणि राहणारच, उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जाहीर निषेध, पण त्याच वेळी बॅनरच्या खाली एक टीप लिहिली आहे यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास रोख एक लाख रुपयांची रक्कम देण्यात येईल, असेही काळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. राज्यपालांच्या या विधानाचा राष्ट्रवादी, शिवसेना मनसे आणि काँग्रेस पक्षाकडून समाचार घेण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिंदे गट यांनी मात्र यावर माैन बाळगले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या पिढीचे आदर्श होते, आता बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी आदर्श आहेत असा उल्लेख केला होता. महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही त्यांनी असेच विधान केले होते.