शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांनी चेहऱ्यावर लावले असे काही…
पाटलांच्या नव्या प्रयोगाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल, पोलिसही सतर्क
पुणे दि १७(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर त्यांनी दिलगीरी व्यक्त करूनही त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध म्हणून एका व्यक्तीने त्यांच्यावर शाईफेक केली होती. या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांवर पुन्हा एकदा शाईफेक करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे पाटीलही सतर्क झाले आहेत.
शाईफेक प्रकरणानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता सावध भूमिका घेतली आहे. पुन्हा शाईफेकीची धमकी आल्यानं चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना फेस शिल्डचा वापर केला आहे. फेस शिल्ड लावत ते पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाला हजर झाले होते. चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर शाईफेकीची धमकी आली होती. दोन व्यक्तींनी फेसबुक पोस्ट करत ही धमकी दिली होती. त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. मात्र दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याने शाईफेक होण्याची शक्यता होती. यामुळे चंद्रकांत पाटलांनी खबरदारी म्हणून फेस शिल्ड लावत उद्घाटन केले.त्यांनी लावलेल्या फेस मास्कचे फोटो सोश मीडियात व्हायरल होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक कवच लावलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.