
प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिला दम?
दरेकर मुख्यमंत्र्यावर चिडले, भाजपाची थेट एकनाथ शिंदेंवरच दादागिरी
नागपूर दि २९(प्रतिनिधी)- शिंदे गट आणि भाजपात सर्वच काही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणे अनेक भाजप नेत्यांना रूचलेले नाही. चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता या यादीत प्रवीण दरेकर यांची भर पडली आहे. दरेकर यांनी चक्क एकनाथ शिंदे यांना दमात घेण्याचा प्रयत्न केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर दोन्ही पक्षातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
विधान परिषदेत परळ येथील गांधी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीचा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करणार का, असा प्रश्न प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी विचारला होता. त्यावर याची माहिती घेतली जाईल, असे मोघम उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. पण या उत्तरामुळे समाधान न झालेले दरेकर अचानक आक्रमक झाले. “दोनशे कोटींचा हा घोटाळा आहे. माहिती कसली घेता, असा सवाल आमदार दरेकर यांनी उपस्थित केला. यावर ‘मुख्यमंत्र्यांनाही तुम्ही बोलू देत नाही. तुम्ही विरोधी पक्षात आहात का..? असे विचारत सभापती निलम गोऱ्हे यांनी आमदार दरेकर यांना सुनावले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही भाजपासमोर नमते घेत आमदार दरेकर यांनी भगवती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाबाबत मुद्दा मांडल्याने त्यासाठी आजच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सूचना दिल्या जातील. या रुग्णालयांच्या सुधारणेसाठी दोन महिन्याचे नियोजन केले जाईल व निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे सत्तेची खरी चावी भाजपाकडेच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
शिंदे गट आपणच खरी शिवसेना वाचवली आम्हीच खरे शिवसेना असल्याचे वारंवार सांगत असतात.पण एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील मुख्यालयाला भेट दिली. त्यावर भाजपाने एकनाथ शिंदे संघाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितल्याने शिंदे गटाची अडचण झाली आहे. तर विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. पण भाजपा आणि शिंदे गटातील बेबनाव कोणत्या टोकाला जाणार हे कालपरत्वे स्पष्ट होणार आहे.