इतिहास नामांतराचा ऎतिहासिक कारणांना राजकारणाची किनार
ओैरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर व्हाया उस्मानाबाद ते धाराशिव
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- केंद्र सरकारने ओैरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे पण या दोन शहरांची नावे बदलण्याचा संघर्ष खुप जुना आहे आणि त्यांची नावे का पडली होती याचाही एक मोठा इतिहास आहे.
ओैरंगाबादचे नाव संभाजीनगर करा अशी पहिल्यांदा मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. कारण १९८८ मध्ये औरंगाबाद महापालिकेत एकहाती ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर बाळासाहेबांनी ओैरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला होता. तेव्हापासून शिवसेनेसह भाजप, आणि नंतर मनसे देखील औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करत होते. ओैरंगाबाद शहराचे राजकारण नेहमी या भोवतीच फिरते राहिलेले आहे. राज्यात पहिल्यांदा सेना भाजपाचे सरकार आल्यानंतर युती सरकारने नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे त्यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री होते. पण केंद्राकडुन त्याला मान्यता मिळाली नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नामांतरावरची भूमिका नेहमीच तत्कालीन कारणांवर आधारलेली राहिली. त्यांनी संभाजीनगरचे समर्थनही केले नाही आणि त्याला विरोधही केला नाही. पण महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना नामांतराच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध न करता ठराव पास केला होता. पण शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी संभाजीनगरचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करत तो प्रस्ताव केंद्राला पाठवला होता, तो मंजूर करण्यात आला आहे. पण या निर्णयावर एमआयएमचे खासदार जलील यांनी आक्षेप घेतला आहे. या पक्षाचा पहिल्यापासुनच नामांतराला विरोध राहिलेला आहे. आता महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने नामांतरावरुन पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
उस्मानाबादचे धाराशिव करण्याची मागणी पहिल्यांदा शिवसेनेने केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी धाराशिव नामांतराची घोषणा करत तसा प्रस्ताव केंद्राला पाठवला होता. पण या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत स्थगिती मिळविली होती. त्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी नामांतराचा प्रस्ताव मागे घेतला होता. पुढे नामांतराच्या फक्त घोषणा होत राहिल्या पण अखेर नामांतरला केंद्र आणि न्यायालयाची परवानगी मिळाल्याने नामांतराचा मार्ग मोकळा झाला. उस्मानाबादचे जुने नाव धाराशिव असे असल्याचे काही पुरावे आहेत. गावचे ग्रामदैवत असलेल्या धारासूर मर्दिनी देवीच्या नावावरून ‘धाराशिव’ असल्याचे पुरावे सापडतात. त्यामुळे धाराशिव नाव करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
दोन्ही शहराचे नामांतर झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे यावरून श्रेयवादाची लढाई रंगली आहे. ती रंगणात हे अपेक्षित होते. पण आता यावरून इतर शहरांच्याही नामांतराची मागणी करण्यात येत आहे. आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. पण तूर्तास नामांतराचा जल्लोष होताना दिसत आहे.