फडणवीसांची ‘ती’ घोषणा कंडक्टरला पडली महागात
महिलेने कंडक्टरसोबतचा वाद कॅमे-यात कैद, बघा बस प्रवासात काय घडल?
लातूर दि १५(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार यंदा अर्थसंकल्प सादर करताना अनेक घोषणा केल्या आहेत. त्यातील एक घोषणा म्हणजे महिलांना एसटी प्रवासात दिलेली ५० टक्केची सवलत. अर्थात ही सवलत १ एप्रिल पासून लागू होणार आहे. पण एका कंडक्टरला ही घोषणा चांगलीच महागात पडली आहे.
लातूर जिल्ह्यात दत्तापूर ते लातूर ही बस घेऊन लातूरकडे येत असताना कामखेडा येथून एक महिला बसमध्ये चढली.यावेळी कंडक्टरने तिकिटाची विचारणा केली असता महिलेने तिकिटाचे अर्धेच पैसे दिले.कंडक्टरने पूर्ण पैसे मागितले असता,महिलांना हाफ तिकीट झाले आहे, नेमानं तिकीट घ्यायचं, जास्त आगाव बोलायचं नाही, चला कायदा दाखवते तुम्हाला, आता कोणत्याही कार्डाची गरज नाही, महिलांना हाफ तिकीट झालंय असे म्हणत कंडक्टर सोबत वाद चालू लागली. यावेळी इतर प्रवाशांनी त्या महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला. पण महिला काहीच एैकून घेण्याच्या तयारीत नव्हती. अखेर त्या महिलेने अर्ध्याच तिकिटावर प्रवास केला. सविता माने असे त्या महिलेचे नाव होते तर कंडक्टरचे नाव गोविंद मुंडे आहे. सविता माने यांनी बसमधील प्रकार आपल्या मुलाला सांगितल्यानंतर माने आणि एका अनोळखी व्यक्तीने कंडक्टरला शिविगाळ करत धमकी दिली आहे. दरम्यान बसमधील त्या महिलेची हुज्जत कॅमे-यात कैद झाली.
याप्रकरणी गोविंद मुंडे यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सविता पोपट माने, गोटू पोपट माने आणि अन्य एका अनोळखी व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी,तसेच धमकी दिल्या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.