उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक शिलेदार निखळला
ठाकरे गटातील अजून एक मंत्री शिंदे गटात, चिन्हानंतर नेतेही सोडत आहेत ठाकरेंची साथ
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे माजी मंत्री सुभाष देसाईंच्या मुलाने दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आज आणखी ठाकरेंच्या जवळचे नेते असलेले माजी मंत्री दीपक सावंत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
महाविकास आघाडीने आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.त्यात आघाडीचे नेते सभा घेत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. ठाकरे देखील यावेळी सभा घेणार आहेत.पण दुसरीकडे ठाकरे गटातील नेते आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत शिवसेनेत अर्थात शिंदेगटात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दीपक सावंत हे राजकारणापासून लांब होते. तर २०२० मध्ये सुद्धा ते शिवसेनेला रामराम करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. जुलै २००४ मध्ये पहिल्यांदा दीपक सावंत यांची विधान परिषदेवर वर्णी लागली होती. २०१४ ला शिवसेना-भाजपच्या युती सरकारमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री या खात्याचे कामकाज पाहिले आहे.दीपक सावंत हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जायचे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच, २०२० मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच दीपक सावंत हे पक्षावर नाराज होते. त्यावेळी त्यांनी आपली नाराजी उघडपणे दर्शविली होती.

दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. याच नाराजीमुळे उद्धव ठाकरे आणि दीपक सावंत यांच्यात अंतर निर्माण झाल्याचं बोलले जात होते. सावंत शिंदे गटात जाणार असल्याने पक्षाचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.