चांदणी चौकातुन प्रवास करत आहात तर ही बातमी वाचाच
चांदणी चौकातील उड्डाणपुलाबाबत महत्वाची अपडेट, वाहतुकीसाठीचे नियोजन बघा
पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन १ मे रोजी होणार आहे. चांदणी चौकातील जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालं आहे. १५ ते २० एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.
या चौकातील नवा उड्डाणपूल आणि रस्त्यांचे उद्घाटन १ मे रोजी करण्याचे केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर येथील कामे वेळेवर आणि गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एनडीए चौक परिसरात १५ मार्च रोजी भेट देऊन कामांची पाहणी केली होती. जुन्या पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. त्यासाठी १५ ते २० एप्रिल या काळात गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार असून या मार्गाची माहिती नागरिकांना करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली. चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्विस रोडचे काम आता पूर्ण झाले आहे. ते सर्व्हिस. रोड १० एप्रिलला सुरू होणार आहेत.त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक या दोन पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्या अनुषंगाने लवकरच परिपत्रक शासनाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान नव्या उड्डाणपुलासाठी आवश्यक खांब उभारणीचे काम पूर्ण झाले असून १५ ते २० एप्रिल या कालावधीत गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याकरिता वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे नियोजन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील वर्षी साताऱ्याकडे निघाले होते. त्यावेळी पुण्यातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर या कामाला वेग आला होता.