‘अजित पवार भाजपात आल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार’
शिंदे गटाचा भाजपाला इशारा,भाजप-राष्ट्रवादी युती चर्चेवरून शिंदे गट अस्वस्थ?
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपात जातील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पण आता शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.
पत्रकार परिषदेत संजय शिरसाट म्हणाले की, “सर्व फोकस अजित पवारांवर गेला आहे. अजित पवार हे मोठे नेते आहेत त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये किंवा आमच्याकडे आलेत तर त्यांचे स्वागत करू; पण राष्ट्रवादीचा गट सत्तेत आला तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, पण सध्या अजित पवार आतापर्यंत काही बोलले नाहीत, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत राहायच नाही हे स्पष्ट होत आहे. नाराजीच्या खेळात अजित पवारांना मोहरा बनवला जात आहे, असा आरोप शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार चालतील पण राष्ट्रवादी नको अशी भूमिका शिंदे गटाकडून मांडण्यात आली आहे. शिरसाट पुढे म्हणाले की, अजित पवारांसारख्या शिस्त पाळणाऱ्या नेत्याला नागपूरच्या सभेत बाजूला केलं गेलं. १४ ते १५ आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्यांची भाषण होतात पण ५४ आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला बोलू दिलं जात नाही, हा अजित पवारांचा अपमान आहे. अजित पवार यांनी फोन केला तरीही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे फोन उचलत नव्हते. आघाडीची सध्या बिघाडी होत आहे. अजित पवार आतापर्यंत काही बोलले नाहीत, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत राहायच नाही हे स्पष्ट होत. त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर त्यांच स्वागत करू. पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा गट सत्तेत आल्यास शिवसेना सत्तेबाहेर होईल,” असे शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून भाजपाला इशारा देण्यात आला आहे.
‘पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजित पवार नाराज आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना काही कामांसाठी उद्धव ठाकरे यांची भेट अजित पवार यांनी अनेकदा मागितली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट दिली नाही. असा दावा देखील शिरसाट यांनी केल्याने नवीन चर्चा सुरु झाली आहे.