चीनला मागे टाकून भारत लोकसंख्येमध्ये जगात नंबर वन
संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने जाहीर केली आकडेवारी, 'एवढी' आहे भारताची लोकसंख्या?
दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्येची आकडेवारी जारी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून चीनलाही मागे टाकलं आहे. जगातली सर्वाधिक लोकसंख्या ही भारतात असल्याची नोंद करण्यात आली आहे. आता भारत लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असणार आहे.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या डेटावरून असे दिसून येते की भारताने चीनला मागे टाकून १४२.८६ कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. सध्या चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी इतकी आहे. अहवालातील ताजी आकडेवारी ‘डेमोग्राफिक इंडिकेटर्स’ या श्रेणीमध्ये देण्यात आली आहे. चीनच्या तुलनेत भारतात तब्बल ३० लाख लोक जास्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे.भारताच्या लोकसंख्येत फक्त एका वर्षात १.५६% वाढ झाली आहे. अहवालानुसार, भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. १९५० नंतर पहिल्यांदाच भारताच्या लोकसंख्येने चीनला मागे टाकले आहे. या संदर्भात, एनएफपीएच्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०२३’ ने अहवाल प्रसिद्ध केला आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी ८ लाख इतकी घट लोकसंख्येत नोंदवण्यात आलेली. तर दुसरीकडे भारताच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. दरम्यान भारत हा युवांचा देश म्हटला जात आहे. ० ते १४ वर्षे वयोगटाचा एकूण लोकसंख्येतील वाटा २५ टक्के आहे. १० ते १९ वयोगटातील १८ टक्के, १० ते २४ वयोगटातील लोकांची संख्या २६ टक्के आहे. १५ ते ६४ वर्षे वयोगटातील लोकांची संख्या ६८ टक्के आहे. तर ६५ वर्षे वयावरील लोकांचा लोकसंख्येतील वाटा हा ७ टक्के आहे.
१८२० मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे १३.४०कोटी होती. १९ व्या शतकापर्यंत भारताची लोकसंख्या २३ कोटींच्या पुढे गेली. २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०० कोटींच्या पुढे गेली. सध्या भारताची लोकसंख्या १४० कोटींच्या आसपास आहे. २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या सुमारे १६६ कोटी असेल असा अंदाज आहे.