भाकरी फिरवायची वेळ आली आहे, नाही तर ती करपते
शरद पवारांकडून पक्षात बदलांचे संकेत, अजित पवार गटाला पवारांचा इशारा?
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- पक्षात तरुणांना सक्रिय करायचे असेल तर त्याना पक्षात विविध पद दिली गेली पाहिजे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी पक्षात लवकरच जबाबदारीत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेकांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. तर अनेकांना नवीन संधी मिळू शकते.
चेंबूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले “जे अधिक काम करतील, त्यांना उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवीन नेतृत्व तयार केलं जाईल. त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, भाकरी फिरवायची वेळ आली आहे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते.” असंही पवारांनी म्हंटले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. याकडे अजित पवार यांच्या कथित भाजपा प्रवेशाच्या दृष्टीने देखील पाहिले जात आहे. त्यामुळे पवार यांच्या भाकरी फिरवण्याच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. पवार यांनी आधीही भाकरी फिरवली आहे. त्यामुळे पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावरून राज्यात सत्ताबदल होणार का? राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत, भाजपासोबत जाणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.
तरुणांना संधी दिली गेली पाहिजे. तरुणांना पक्षात घ्यावे असे मी नेत्यांना सांगेल. जे लोक संघटनेत काम करतात त्यांना सांगण आहे की पाच ते सहा वर्ष युवक चळवळीत काम करणाऱ्यांना संघटनेत घ्या. याठिकाणी त्यांनी काम प्रस्तावित केलं तर त्यांना महापालिकेसाठी संधी द्या. अशा सूचना आपण परदेशाध्यक्ष यांना करणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.