Latest Marathi News

दोस्ती साठी काय पण! चित्तरंजन गायकवाडांसाठी दोस्ताचा नवस

विकास कदम,योगेश काळे यांच्या जिगरी दोस्तीची जिल्ह्यात चर्चा, व्हिडिओ व्हायरल

पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणूकीत चित्तरंजन गायकवाड सरपंच पदावर निवडून आले आहेत. गायकवाड यांनी सरपंच म्हणून निवडून यावेत यासाठी त्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम यांनी नवस केला होता आता गायकवाड निवडून आल्यावर त्यांनी तो नवस पूर्ण केला आहे.सध्या जिल्ह्यात या नवसाची जोरदार चर्चा सुरु आहे.

विकास कदम यांनी आपला मित्र चित्तरंजन गायकवाड यांची सरपंच पदी निवड व्हावी, तसेच त्यांच्या प्रभागात उभे असलेले अन्य उमेदवार देखील निवडून यावेत, साठी कदमवाकवस्ती येथील गणेश मंदिरापर्यंत दंडवत घालण्याचा नवस बोलला होता. निवडणुकीत चित्तरंजन गायकवाड आणि त्यांचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. त्यामुळे विकास कदम आणि त्यांचे दुसरे मित्र योगेश काळभोर यांनी पुणे – सोलापूर महामार्ग ते कदम वाक वस्ती येथील गणेश मंदिरापर्यंत असणारे ५०० मीटर अंतर दंडवत घालून पूर्ण केले. या दंडवत घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका मराठी मालिकेतील तुमच्यासाठी कायपण प्रमाणे कदम यांनी मित्रासाठी केलेल्या नवसासाठी दोस्तीसाठी कायपण असा डायलाॅग प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी देखील कदमबाक वस्तीच्या सरपंच राहिलेल्या आहेत. आता चित्तरंजन गायकवाड यांच्या हाती गावचा कारभार असणार आहे.

कदमवाकवस्ती ही हवेली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. पुणे महापालिकेला चिकटून असल्याने ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या देखील महत्वाची मानली जाते. पण या ग्रामपंचायतीवर गायकवाड यांचा वरचष्मा राहिलेला आहे. निवडणूकीच्या काळात विजयासाठी अनेकजण वेगवेगळे फंडे वापरत असतात पण सध्या विकास अशोक कदम आणि योगेश विकास काळे यांनी दोस्तासाठी केलेल्या जवसाची जोरदार चर्चा सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!