Latest Marathi News
Ganesh J GIF

इर्शादवाडीतील ग्रामस्थांना स्वराज्य संघटनेचा एक हात मदतीचा

स्वराज्य संघटना दहिटणेच्या वतीने जीवनोपयोगी वस्तूंची मदत, छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते मदतीचे वाटप

रायगड दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी दरोडा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. १९ जुलैच्या रात्री इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. यामध्ये अनेकजणांचा बळी गेला होता. पण आता रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर चार दिवसांनी शोध कार्य थांबवण्यात आले आहे. इर्शाळवाडीची लोकसंख्या २१९ इतकी आहे. त्यापैकी १३९ जण हयात आहेत. तर २७ जणांचे मृतदेह सापडले. इतर ५३ जणांचा शोध लागला नाही. पण आता बचावलेल्या नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. पण आता छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्यकडून येथील नागरिकांना मदत करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बार्शी तालुक्यातील स्वराज्य संघटना दहिटणे आणि सर्वार्थ सेवा संगम शेळगाव यांच्यावतीने आर्थिक आणि जीवनोपयोगी साहित्य देत मदत करण्यात आली आहे. यात धनादेश, तसेच १०० साड्या, १००कपडेजोड,७० रेनकोट आणि ३० लहान मुलांच्या कपड्यांचे जोड अशी मदत करण्यात आली आहे. संभाजी महाराजांनी या घटनेनंतर दु:ख व्यक्त करत इर्शाळवाडी येथील दुर्गघटनाग्रस्तांची भेट घेऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांच्या सोबत दहिटणे आणि शेळगावमधील पदाधिकारी सोबत होते. महाराजांच्या हस्तेच ही मदत थेट इर्शाळवाडी ग्रामस्थांना देण्यात आली आहे. यावेळी स्वराज्य संघटना दहिटणेचे अध्यक्ष प्रशांत काशीद, सुरज सौंदळे, आदेश घोंगाणे, कृष्णा काशीद, प्रवीण काशीद, करण पवार सर्वार्थ सेवा संगम शेळगावचे संस्थापक विश्वास थोरात व पदाधिकारी उपस्थित होते. मदतीविषयी बोलताना प्रशांत काशीद म्हणाले की, इर्शाळवाडीतील घटना दुर्देवी आहे. या दुर्घटनेनंतर संभाजी महाराजांनी मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनानंतर ही मदत करत आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळातही मदत करण्याचा प्रयत्न राहील असा मनोदय प्रशांत काशीद आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान भविष्यात कधीही इर्शाळवाडी, माळीण यांसारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखल्या पाहिजेत आणि त्यांची तंतोतंत अमंलबजावणी झाली पाहिजे, अतिरेक टाळला पाहिजे अशी मागणी संभाजी महाराजांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!