
सापळा तस्करांसाठी रचला, पण जाळ्यात अडकला स्वतःचाच सहकारी!; मुंबईत ड्रग्ज खरेदी करताना पोलीस शिपाईच जाळ्यात
मुंबईतील मालवणी परिसरात अमली पदार्थ (ड्रग्ज) तस्करीविरुद्ध पोलिसांनी राबवलेल्या एका धडक कारवाईदरम्यान अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज विक्रेते आणि ग्राहकांना पकडण्यासाठी मालवणी पोलिसांनी रचलेल्या विशेष सापळ्यात खुद्द पोलीस दलातील एक शिपाईच ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडला गेला आहे. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मालवणी परिसरातील एका गेटजवळ अमली पदार्थांची मोठी खरेदी-विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला होता. कारवाईदरम्यान एक व्यक्ती संशयास्पदरित्या ड्रग्ज खरेदी करताना आढळल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून सखोल चौकशी केल्यानंतर, ताब्यात घेतलेली व्यक्ती ही स्वतः पोलीस शिपाई असल्याचे उघड झाले.

आरोपीची ओळख आणि पार्श्वभूमी
किरण इंदुलकर असं पोलीस शिपायाचे नाव असून तो जोगेश्वरी पोलीस ठाणे येथे कर्तव्यास आहे. आरोपी किरण इंदुलकर याने यापूर्वी मालवणी पोलीस ठाण्यातही सेवा बजावली होती.
१५ हजार रुपयांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी किरण इंदुलकर याच्याकडून सुमारे १५ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम मेफेड्रॉन (MD) जप्त करण्यात आले आहे. कारवाईच्या वेळी तो पोलीस दलात कार्यरत असल्याची कोणतीही कल्पना पकडणाऱ्या पथकाला नव्हती. मात्र, चौकशीत सत्य बाहेर आल्याने सर्वच अवाक झाले. सध्या मालवणी पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून, तो स्वतःसाठी ड्रग्ज खरेदी करत होता की यात इतर कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

