
वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनांवर ही नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे आता परिवहन विभागाने (Transport Department) कठोर पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. ज्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट नसेल, त्यांच्यावर आता थेट दंडात्मक व कडक कारवाई केली जाणार आहे.

राज्यातील सध्याची स्थिती काय सांगते?

परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार सुमारे १ कोटी १० लाख ८४ हजार वाहनधारकांनी HSRP साठी नोंदणी केली आहे.यातील सुमारे ९८ लाख ८ हजार वाहनांवर प्लेट बसवण्यात आली आहे. मात्र, यानंतरही मोठ्या संख्येने चालकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे अशा निष्काळजी वाहनधारकांना आता मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.

रस्त्यांवर विशेष पथकांकडून होणार वाहनांची तपासणी
ज्या वाहनांवर जुन्या किंवा अनधिकृत नंबर प्लेट्स आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी परिवहन विभागाने विशेष पथके (Special Squads) तयार केली आहेत. शहरांमधील मुख्य रस्ते आणि महामार्गांवर वाहनांची अचानक तपासणी केली जाईल. तपासणीदरम्यान नियमभंग आढळल्यास चालकांवर तात्काळ कारवाई केली जाऊ शकते.
HSRP नंबर प्लेट का महत्त्वाची आहे?
HSRP ही ॲल्युमिनियमपासून बनवलेली विशेष नंबर प्लेट असते. यावर निळ्या रंगाचा क्रोमियम-आधारित अशोकचक्राचा होलोग्राम, युनिक लेझर कोड आणि स्नॅप-लॉक सिस्टीम असते. HSRP सोबत इंजिन आणि चेसिस नंबरची माहिती देणारा विशेष स्टिकरही मिळतो. ही नंबर प्लेट सहज काढता किंवा बदलता येत नाही. यामुळे चोरीच्या वाहनांचा मागोवा घेणे आणि गैरवापर रोखणे पोलिसांना व प्रशासनाला सोपे जाते.कारवाईची वेळ येण्यापूर्वी आणि दंड भरण्यापूर्वी सर्व वाहनधारकांनी अधिकृत पोर्टलद्वारे HSRP नंबर प्लेटची नोंदणी करून ती लवकरात लवकर आपल्या वाहनावर बसवून घ्यावी.

