शिंदे गटाच्या आमदारांच्या कारला डंपरने धडक दिल्याने अपघात
नेत्यांच्या अपघाताच्या प्रमाणात वाढ, अवैध वाळूचोरीचा प्रश्न एैरणीवर, आमदार जखमी
जळगाव दि २७(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे आणि त्यांचे पती तथा माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला जळगावच्या करंज गावाजवळ अपघात झाला आहे. एका डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. पण सुदैवाने दोघेही सुखरूप आहेत.
आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते कुरवेल ते तावसा या रस्त्याचे भूमिपूजन होते. तो कार्यक्रम आटोपून आमदार सोनवणे यांच्यासह त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे जळगावकडे येत होते. त्या वेळी चालकासह अंगरक्षकही वाहनात होते. त्या वेळी डंपरने आमदार सोनवणे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान होऊन वाहनातील चारही जणांना दुखापत झाली. अपघात होताच जखमींना जळगावला हलविले व प्राथमिक उपचार करून घरी नेण्यात आले. दरम्यान अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी तेथे धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करण्याचे काम सुरू केले होते. या अपघातामुळे मात्र आता जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांच्या अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. आमदार योगेश कदम, आमदार बच्चू कडू, धनंजय मुंडे, जयकुमार गोरे आणि विनायक मेटे या नेत्यांसोबत अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता.
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा अलीकडच्या काळात ऐरणीवर आला आहे. यातून अनेकदा लहान-मोठे अपघात देखील झाले आहेत. आज झालेला अपघात हा देखील वाळू वाहतूक करणार्या डंपरचालकाच्या बेपर्वाईने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आता आमदाराच्या अपघातानंतर तरी वाळू माफियांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.