नागपूर दि १९(प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनगर समाजाकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार होता, पण हा मोर्चा पोलिसांनी टेकडी रोडवर अडवला. यावेळी त्यांची घेण्यासाठी आलेल्या रोहित पवारांवर धनगर बांधव संतप्त झाल्याचे पहायला मिळाले.
धनगर समाजाच्या या मोर्चामध्ये जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला, पण रोहित पवारांच्या आगमनामुळे धनगर समाजाचे कार्यकर्ते भडकले. आंदोलनकर्त्यांनी रोहित पवारांची भेट घेतली पण त्यांना मंचावर येऊ दिलं नाही. चर्चा करताना आंदोलकांनी तुम्हाला कुणी बोलावलं? असा प्रश्न विचारत,घोषणाबाजीला सुरूवात केली, यानंतर पोलिसांनी रोहित पवारांना गर्दीतून बाहेर काढले. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी रोहित पवार म्हणाले की, धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दत्तात्रय भरणेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत मुद्दे पोहोचले होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांच्या पुस्तक वाटपावर पडळकर यांनी टिका केली आहे. “रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवारांना ‘संघर्ष’ शब्दाचा अर्थतरी कळतो का?, त्यांनी असा कोणता संघर्ष केला आहे, की ते ‘संघर्ष’ नावाचं पुस्तक वाटतायेत. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्याचीही या पवार कुटुंबियांची पात्रता नाही. अशी टिका त्यांनी केली आहे.