एकनाथ शिंदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही उद्धव ठाकरेंना धक्का?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अडचणी वाढल्या या कारणामुळे राष्ट्रवादी देणार धक्का?, आघाडीत बिघाडी
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरीही शिंदेकडून ठाकरेंना देण्यात आलेली धक्क्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. विधानसभेच्या ४० आमदारांनंतर शिंदेंनी आता विधानपरिषदेच्या आमदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण आता राष्ट्रवादीच ठाकरेंना जोरदार धक्का देऊ शकते.
विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे विधान परिषदेतील संख्याबळात फार मोठे फेरबदल झाले आहेत. विप्लव बजौरिया आणि मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. सध्या ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या ९ झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील ९ आहे. तर काँग्रेसचे संख्याबळ ८ आहे. विधानपरिषदेत पाच अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी किशोर दराडे यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला आहे तर सत्यजीत तांबे यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. पण दराडेंनी पाठिंबा काढला तर मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. सध्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि उपसभापतीपद ठाकरेंकडेच आहे. विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेसकडूनही दावा होऊ शकतो. सध्या महाविकास आघाडीमध्ये मतमतांतराचं चित्र आहे. या परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद सोडणार नाही, त्यामुळे संख्याबळ कोणाकडे जाणार हे पाहावे लागेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली. सध्या विधानपरिषदेतील संख्यसबळ पाहूया
विधानपरिषदेतील संख्याबळ
भाजप – २२
ठाकरे गट -०९
शिवसेना -०२
राष्ट्रवादी काँग्रेस-०९
काँग्रेस -०८
अपक्ष इतर- ०७
रिक्त जागा -२१