मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गट आणि भाजपातील नाराजी उफाळणार?
शिंदे गटातील सर्वांनाच हवेय मंत्रीपद, भाजपाकडून त्यागाचा आदेश, सरकार अस्थिर होणार?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष होत आले तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांनामध्ये नाराजी वाढत चालली आहे. शिंदे गटातील ४० आमदार हे मुळातच मंत्रिपदाच्या इच्छेने शिंदे सोबत आलेले आहेत. पण आता मंत्रिमंडळ विस्तार का लाबंत आहे याचे आणखी एक कारण समोर आले आहेत.
शिवसेनेत ज्याप्रमाणे फूट पडली तशीच फूट भाजपात पडेल अशी भिती भाजपाला सतावत आहेत. अर्थात त्यामुळे शिवसेना कोणाची असा वाद येणार नसला तरी जिल्ह्यात मात्र एकमेकांविरोधात शह काटशहाचे राजकारण रंगण्याची भीती भाजपाला आहे. कारण भाजपमध्ये निष्ठवंत आणि काँग्रेस, राष्ट्रवदीमधून आलेले असे दोन गट आहेत. तर दुसरीकडे विस्तारात १४ जणांना संधी मिळणार आहे. यातील काही जागा शिंदे गटाला मिळणार आहेत. म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी तर पुण्याच्या कार्यकारिणीत अनेकांनी त्यागाची भावना ठेवावी असे आवाहन केले होते. पण देवेंद्र फडणवीसांकडे मात्र सहा खात्याची मंत्रीपदे ठेवली आहेत. त्यातच आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहे. शिंदे गटात तर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापासून नाराजी आहे. कारण त्यावेळी अनेक आमदारांनी त्यांना मंत्रीपदाची न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. संजय शिरसाठ यांनी तर आपली नाराजी जाहीर देखील केली होती. त्यामुळे जर कोणाला मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही तर ते परत ठाकरेंकडे परत जाण्याची शक्यता आहे. शिंदे मंत्रिमंडळ विस्तार होणार हे सांगत असताना आमदारांना एकत्र ठेवणे हा एकमात्र हेतू दिसत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार शिवाय राज्यात विस्तार होणार नाही हे देखील समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा केंद्र नेतृत्वाचा हिरवा कंदिल आल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळेच शिंदे फडणवीस लवकरच दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.