अजित पवार पुन्हा नाराज? शरद पवारांच्या प्रेसला दांडी
अजित पवार यांच्या मनात चाललयं तरी काय?, पवार म्हणाले कोणाला जायचे असेल तर...
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा शरद पवारांनी केली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्व महत्वाचे नेते या पत्रकार परिषदेला शरद पवारांसोबत उपस्थित होते. मात्र एक व्यक्ती या पत्रकार परिषदेला गैरहजर होती आणि ती म्हणजे अजित पवार. त्यामुळे अजित पवारांबद्दल परत चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवार यांच्या भुमिका नेहमीच राष्ट्रवादीच्या विरुद्ध राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कृतीची चर्चा होत असते. पहाटेच्या शपथविधीपासून अजित पवार यांच्याबद्दल संशयाचे वातावरण आहे. शरद पवार यांच्या राजीनामा देण्याच्या दिवशीही अजित पवार यांचे वागणे वेगळे होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली, त्यावेळी सर्व नेते शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याचा आग्रह करत असताना अजित पवारांनी मात्र वेगळी भूमिका घेतली होती. अजित पवारांनी त्यावेळी शरद पवार यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. त्याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना देखील खडे बोल सुनावले होते. पत्रकार परिषदेत शरद पवारांना अजित पवारांच्या गैरहजेरीवर प्रश्नही विचारला गेला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की ‘पत्रकार परिषदेला कोणी अनुपस्थित असेल तर त्याचा वेगळा काही अर्थ काढू नका, पत्रकार परिषदेला सर्वच्या सर्व पत्रकार तरी कुठे उपस्थित असतात?’ शरद पवारांनी हे उत्तर दिले असले तरी अजित पवारांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. दुसरीकडे अजित पवार यांचे संभाव्य बंड मोडून काढण्यासाठीच पवारांनी राजीनामा अस्त्र वापरले असल्याची देखील चर्चा आहे. त्याचबरोबर आज निवड समितीने शरद पवारांच्या राजीनामा नामंजूर केल्यानंतर अजित पवार काहीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले होते. त्यामुळे अजित पवार निवड समितीच्या निर्णयावर नाराज आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांना सुनावण्यापासून ते सुप्रिया सुळेंना दम देण्यापर्यंत अजित पवार आक्रमक झाले होते. त्याचबरोबर अजित पवार दिल्लीला गेल्याच्या चर्चा होत्या पण अजित पवार यांनी ते वृत्त फेटाळले आहे. पण या सर्व घडामोडीत अजित पवार यांची चर्चा सुरु झाली आहे.