रश्मी आणि तेजस ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे परत एकत्र येणार, एकनाथ शिंदे म्हणाले आमची भेट....
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आमदारांसह बाहेर पडले. भाजपसोबत सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात कमालीचे वितुष्ट आले होते. त्यात सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच जाहीर होणार असुन हा निर्णय शिंदेच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काही दिवसात लागणार आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची २ मे रोजी पहाटे भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का ? अशा चर्चा देखील रंगल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील निकाल येत्या पाच ते सहा दिवसात लागण्याची शक्यता आहे. या निकालानंतर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळणार असून सत्ता राखण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी भाजपसोबत हातमिळवळी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ह्या भेटी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान जर ही भेट झाली असेल तर राज्याच्या राजकारणात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. अचानक भेट घेण्याचे कारण काय, तेजस आणि रश्मी ठाकरे यांनी का भेट घेतली असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. रश्मी ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवाशी माझी भेट झाल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत, या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असून त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही भेट झालेली नाही. असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटवरून म्हटलं आहे.