अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गटाला मोठा धक्का, देवेंद्र फडणवीस यांची भुजबळांना ऑफर?, महायुतीत तणाव?
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राजकारण सध्या कमालीचे अनिश्चित झाले आहे. कारण कोण कधी कुठल्या पक्षात प्रवेश करेल याची शाश्वती राहिलेली नाही . आणि अशातच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळे या चर्चा राज्यात सुरू झाल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यवर टिका करताना एक दावा केला आहे. त्यांना पलटी मारायची सवय आहे., त्यामुळे त्यांना भाजपची ऑफर असेल असे म्हणत जरांगे पाटील यांनी भाजपालाही लक्ष्य केले आहे. छगन भुजबळ यांना भाजपकडून काहीतरी ऑफर आली असणार कारण गृहमंत्री त्यांना थांबवत नाहीत, आणि काही बोलतही नाहीत असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. भुजबळ तेढ निर्माण करणारे वक्तव्य करतायत. आमचे बॅनर फाडले जातायत. त्यामुळे अजित पवारांनी भुजबळांना रोखावं अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते म्हणाले “तुम्ही सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेतला असं म्हणता. मात्र तुम्ही एकाही शिक्षण संस्थेला त्यांचं नाव दिलं नाही. जातीय तेढ निर्माण करणं हे तुमचं पुरोगामित्वं आहे का? तुम्ही ओबीसींचा, बहजुनांचा नेता म्हणून का मिरवताय? तुम्ही सगळ्या ओबीसी बांधवांना एकत्र करताय. तर तुमची धनगर आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे, ते स्पष्ट करा. तुम्ही अद्याप ती भूमिका स्पष्ट केलेली नाही. सभेला गर्दी जमवायची आणि त्याचा वापर करून घ्यायचा” असे आपले धोरण असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान मराठा आरक्षणावर बोलताना आम्ही आता २४ डिसेंबर पेक्षा जास्त वेळ सरकारला देणार नाही. माझ्या समाजाला मी विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. २४ तारखेनंतर काय करायचं तो निर्णय मी त्यांनाच विचारुन घेणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस किंवा भाजप पक्षाकडून भुजबळांना कुठल्याही प्रकारची पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आलेली नाही. किंवा भुजबळांकडूनही असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. पक्षाचा प्रमुख म्हणून ईश्वर साक्ष सांगतो की ते सत्ताधारी पक्षात असताना त्यांनी भाजपात का प्रवेश करावा हा एक मोठा प्रश्न आहे. असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे. तर छगन भुजबळ यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.