
‘अजित पवार सत्तेत सामील झाल्याने भाजपाला फरक पडत नाही’
भाजपा नेत्याचे मोठे वक्तव्य, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप नेत्यांकडून अजित पवार लक्ष्य?
सातारा दि २९(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत. पण ते सत्तेत सामील झाल्यानंतर शिंदे एैवजी ते मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण आता भाजपाच्या केंद्रीय मंत्री मिश्रा यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यामुळे महायुतीत आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
केंद्रीयमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्याचे १८ कोटी सदस्य आहेत, त्यामुळे भाजपला काही फरक पडेल, असे नाही. अजित पवार आल्याने भाजपवर कसलाही परिणाम होणार नाही, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ४८ जागांवर भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणणार आहे. त्याकरिता भाजपची संघटनात्मक बांधणी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण, विश्वकर्मा योजना आदी विविध योजनांच्या माध्यमातून देशाला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे. असेही मिश्रा म्हणाले आहेत. त्याचबरोबर सातारा हा कधीतरी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आता नाही. या पुढील निवडणुकीत साताऱ्यातील सर्व आमदार आणि खासदार भाजपचे असतील. साताऱ्यामध्ये भाजपचे संघटन मजबूत असून, येथे उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. असे म्हणत मिश्रा यांनी साता-यात पुढचा खासदार भाजपाचाच असेल असा दावा केला आहे. पण अजित पवार यांच्याबद्दल असे वक्तव्य केल्याने महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा आहे. आता यावर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवार सत्तेत सामील झाले असले तरीही भाजपाचे काही नेते अजूनही अजित पवारांवर टिका करत आहेत. गोपीचंद पडळकर यांनी तर पवारांवर शेलक्या शब्दात टिका केली होती. तर मोहित कंबोज यानेही अजित पवार यांच्यावर तिरकस टिका केली होती. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.