अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड?
जयंत पाटलांची उचलबांगडी होणार, अजित पवारच 'दादा', जयंत पाटील वेगळा मार्ग निवडणार?
मुंबई दि २(प्रतिनिधी) – अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीतील हालचालींना वेग आला आहे. पण अजित पवार यांनी आपला निर्धार पक्का केला असुन आज अजित पवार यांनी आपले समर्थक आमदार, खासदार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली होती. त्यानंतर अनेकवेळा त्यांनी त्याचे समर्थन देखील केले होते. या संदर्भात शरद पवार यांनी ६ जुलैला बैठक बोलावली आहे. पण त्याआधीच अजित पवार यांनी आपले राजकीय वजन दाखवत शक्तीप्रदर्शन करत आहेत. अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे, शेखर निकम हे आमदार उपस्थित आहेत, तर सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत काय ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे अजित पवार लवकरच प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी आपल्या पदाची पाच वर्ष दोन महिने इतका कालावधी पूर्ण केला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या राजघटनेनुसार एका व्यक्तीला एका पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. त्यामुळेच आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा जोरात सुरू आहे.
जयंत पाटील यांना अजित पवारांच्या जागी विरोधी पक्षनेता बनवले जाण्याची शक्यता आहे. मध्यंतरी जयंत पाटील राष्ट्रवादीतुन बाहेर पडणार असल्याची चर्चा होती, तर मध्यंतरी अजित पवार भाजपात जाणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे दोन नेत्यांमधील सुप्त संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता जयंत पाटील यांना दुसरी जबाबदारी देणार की वेगळा मार्ग निवडणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.