अजित पवार यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द
दाैरा अर्धवट सोडल्याने राजकीय चर्चांना उधाण, कारण अजूनही अस्पष्ट, भूकंपाचे संकेत
पुणे दि ७(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. आज सकाळी ते पुण्यात आले. बारामती होस्टेलवर त्यांनी सकाळपासून बैठका घेतली त्यानंतर पत्रकारांनी संवाद साधला. पण त्यानंतर अचानक त्यांनी
सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. पण सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे कारण आणि ते कोठे गेले आहेत, याची कोणालाही माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते त्यांच्या कारने मुंढवा येथील कार्यक्रमासाठी निघाले मात्र कार्यक्रमस्थळापासून अगदी काही मिनीटांच्या अंतरावरून ते दुसरीकडे फिरले. त्यांनी सहकाऱ्यांना मुंढवा येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितले. पुणे शहर व परिसरात आज अजित पवार यांचे आठ कार्यक्रम होते. उद्या देखील त्यांचे शहरात काही कार्यक्रम आहेत त्यांना तरी अजित पवार उपस्थित राहाणार का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. पण त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याशिवाय राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चा वाढू नये यासाठी अजित पवार माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवार यापूर्व देखील असेच दौरा अर्धवट सोडून निघून गेल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत राष्ट्रवादी पक्षाकडून देखील कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण त्यामुळे अजित पवार नाराज ते नवीन राजकीय भूकंप अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत.
अजित पवार यांनी आज दुपारीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली होती. ‘राज्य सरकारमधील मंत्री आणि अन्य सहकारी मंडळी मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचे एवढे काही गांभीर्य वाटत नाही. त्यामुळे सध्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने भुमिका मांडावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.