विधानसभेत धक्काबुक्की केल्यामुळे सर्व विरोधी पक्षच निलंबित
मणिपूर प्रश्नावरून विधानसभेत जोरदार राडा, मुख्यमंत्री आसनाला विरोधकांचा घेराव, व्हिडीओ जोरदार व्हायरल
पणजी दि ३१(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनाचा काळ सुरु आहे. संसदेत मणिपूरवरून जोरदार खडाजंगी होत असताना गोव्यात देखील मणिपूरवरून जोरदार राडा झाला आहे. पण इतिहासात पहिल्यांदाच अनोखी कारवाई करत संपुर्ण विरोधी पक्षाला गोव्यातून निलंबित करण्यात आले आहे. विरोधकांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
गोवा पावसाळी अधिवेशन, तिसरा आठवड्याचा पहिला दिवस आज विविध विषयांमुळे गाजला. राज्यातील बेरोगारांच्या आकडेवारीवरून सुरू झालेला प्रश्नोत्तराचा तास आणि त्यानंतर मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून झालेला गोंधळ यामुळे काँग्रेसच्या तीन आमदारांसह विरोधी सर्व सातही आमदारांना दोन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आमदार जीत आरोलकर यांना धक्का बुक्की करणे, त्यांचा माईक काढून टाकणे, त्यांच्या डोक्यावर सुरक्षा रक्षकांची टोपी जबरदस्तीने घालणे, असे प्रकार केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई, व्हेंझी व्हिएगश, वीरेश बोरकर, क्रुझ सिल्वा, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्ता यांचे आज आणि उद्या असे दोन दिवसांसाठी निलंबन केले आहे. शुन्य प्रहरावेळी काळे कपडे परिधान करून आलेल्या विरोधी आमदारांनी मणिपूर प्रश्नावर चर्चेची मागणी करत सभापतींसमोर मोठा गदारोळ घातला. विरोधी आमदार आक्रमक होऊन हातात फलक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या आसनासमोर येऊन त्यांना घेराव घातला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील सर्वच सदस्य संतप्त झाले.मुख्यमंत्री सावंत यांच्या आक्षेपानंतर ही कारवाई करण्यात आली, विधानसभा कामकाज कायदा २८९ अन्वये ही कारवाई झाली आहे.
मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून गदारोळ झाल्यानंतर विरोधी पक्षातील सात आमदारांच्या निलंबनाची कारवाई शिथील करण्यात आली आहे. आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यानंतर त्यांना आज आणि उद्यासाठी निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, ही कारवाई शिथील करण्यात आली असून, आता निलंबन कारवाईच्या २४ तासानंतर आमदारांना सभागृहात सहभागी राहण्याची परवानगी देण्यात आली.