
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने प्रियकरासोबत केले लग्न?
इस्लाम धर्म स्वीकारत लग्न केल्याचा दावा, सीमा हैदर प्रकरणाची पुनरावृत्ती, अंजू मीणा कोण आहे?
दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही घटना ताजी असतानाच आता राजस्थानातील भिवाडी येथील एक विवाहित महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली आहे. त्यामुळे वेगळ्याच आणि उलटसुलट चर्चेला सुरूवात झाली आहे. तसेच या प्रकरणी धक्कादायक दावे देखील करण्यात येत आहेत.
सीमा हैदर अवैधमार्गे भारतात आली होती.पण अंजू मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पाकिस्तान गेली आहे. अंजूकडे व्हिसा आहे. त्यामुळे तिला पाकिस्तानात अधिकृत प्रवेश मिळाला. ती वाघामार्गे पाकिस्तानात आली आणि इस्लामाबादला गेली. मिळालेल्या माहितीनुसार अंजूचा विवाह २००७ साली अरविंदकुमार बरोबर झाले होते. अरविंद डेटा एन्ट्रीचे काम करताे. अंजूही तापुकरा येथील एका कंपनीत काम करते. अंजू आणि अरविंद यांना दोन मुले आहेत. तिची फेसबुकवर पाकिस्तानातील नसरुल्लाह बरोबर २०१९ ला ओळख झाली होती. त्यानंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले. अंजू २१ जुलैला नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली विशेष म्हणजे अंजूने तिच्या पतीला ती जयपूरला जात असल्याचे सांगितले होते. पण ती पाकिस्तानात गेली. विशेष म्हणजे अंजूने आपली तुलना सीमा हैदरबरोबर न करण्याची विनंती केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, “पाकिस्तानात माझा एक मित्र आहे. त्याच्या कुटुंबीयांशी माझे चांगले बोलणे होते. आम्ही दोन वर्षांपूर्वी मित्र बनलो होतो. मी एका लग्नासाठी इथे आले आहे, पण हे ठिकाण चांगले असल्याने मी फिरायलाही आले. सीमा हैदरशी माझी तुलना करणे योग्य नाही. मी पुन्हा भारतात येणार आहे. लग्नाच्या सुरुवातीपासून माझे आणि माझ्या पतीचे फारसे जमत नाही. मी मजबुरी म्हणून पतीबरोबर राहत होते, पण आता भारतात आल्यानंतर मी पतीशी विभक्त होऊन माझ्या मुलांबरोबर एकटी राहणार आहे,” असेही अंजूने सांगितले आहे. अंजू २० ऑगस्टला भारतात परत येणार असल्याची माहिती तिच्या कथित प्रियकराने दिली आहे.
पाकिस्तानी मिडीयात मात्र अंजूने धर्म बदलला असून तिचा फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहशी निकाह केला असल्याचा दावा केला आहे. अंजूने तिचं नाव आता फातिमा ठेवलं आहे. तिथल्या जिल्हा न्यायालयात त्यांनी निकाह केला. मालकुंड विभागाचे डीआयजी नासिर महमूद दस्ती यांनी अंजू उर्फ फातिमा आणि नसरुल्लाह या दोघांनी लग्न केल्याच्या दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणी जोरदार चर्चा सुरु आहे. अंजू भारतात येणार का? कि पाकिस्तानातच राहणार यावरून देखील वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.