Latest Marathi News

चिंता वाढणार! हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

अल निनोचा प्रभाव वाढला, पेरण्या लांबण्याची शक्यतेने शेतकऱ्यांचे गणित बिघडणार

दिल्ली दि २७(प्रतिनिधी)- भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि शेती ही मान्सुनवर अवलंबून आहे. एकूणच भारताची अर्थव्यवस्थाच पावसावर अवलंबून आहे. या वर्षी मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. पण आता नव्या अंदाजानुसार यंदा पाऊस साधारण असल्यामुळे थोडी खुशी थोडी गम अशी स्थिती राहणार आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात मान्सून सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पॅसिफिक समुद्रात ‘अल निनो’ची चिन्हे असल्यामुळे यंदा पाऊस साधारण राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी या वर्षीच्या जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनच्या हंगामातील सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. महत्वाचे म्हणजे जून महिन्यातही राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसात अंदमान-निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. अरबी समुद्रात मान्सून प्रस्थापित होण्यासाठी अजून एक आठवडा लागणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. ४ जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होईल. मान्सूनच उशीरा येणार असल्यामुळे यंदा जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. महाराष्ट्राचा विभागवार विचार करायचा असल्यास मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, तर उत्तर कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान पुढील २४ तासात बंगालच्या उपसागराचा दक्षिण पट्टा, आणि अंदमान निकोबार बेट समूहाच्या काही भागांमध्ये दक्षिण पश्चिम वारे पुढे सरकण्याची पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीला वेग मिळणार आहे.

सरासरीच्या ९० ते ९६ टक्के पावसाचा अंदाज असेल तर सामान्यापेक्षा कमी पाऊस मानला जातो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के म्हणजे सामान्य पाऊस पडेल, असा अंदाज असतो. सरासरीच्या १०४ ते ११० टक्के म्हणजे सामान्यापेक्षा अधिक आणि ११० टक्क्यांहून अधिक म्हणजे अतिवृष्टी मानली जाते. पॅसिफिक समुद्रात ‘एल निनो’ विकसित होण्याची शक्यता ९० टक्क्यांवर पोहोचली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!