आगामी लोकसभा निवडणुकीत बीडमधून अर्चना कुटे भाजपाच्या उमेदवार?
पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी भाजपकडून मोठी खेळी, खासदार प्रीतम मुंडेंचा पत्ता कट होणार?, प्रवेशाच्या टायमिंगची चर्चा
बीड दि ११(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष सक्षम उमेदवारांचा शोध घेत आहेत. याचा धामधुमीत बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यातून भाजपाने दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. पंकजा मुंडे यांना आव्हान देण्याबरोबरच भाजपाने लोकसभेची देखील तयारी केली आहे.
भाजप आगामी लोकसभेसाठी ४५ प्लस जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यातील बीड लोकसभा ही भाजपाची हक्काची जागा आहे. पण मागील काही दिवसापासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे आपल्याच पक्षाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. नुकतीच दसरा मेळाव्यातून त्यांनी भाजपवरच अप्रत्यक्ष टीका केली होती. तसेच भाजपतीलच त्यांचे जे विरोधक आहेत त्यांना तर त्यांनी थेट ‘त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधू’ असे खुले आवाहनच दिले होते. यात त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांना खंबीर साथ दिली आहे. त्यामुळे भाजपा पंकजा मुंडे यांना पर्याय शोधत होता. तो सुरेश कुठे यांच्या रूपाने मिळाला आहे. भाजपा लोकसभेसाठी प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून त्याठिकाणी सुरेश कुटे यांच्या पत्नी अर्चना कुटे यांना संधी देण्याची शक्यता आहे. कारण अगोदर फक्त सुरेश कुटे हेच भाजपा प्रवेश करणार असल्याची शक्यता होती. पण त्याचवेळी अर्चना कुटे यांनीही भाजपात प्रवेश केल्याने अर्चना कुटे यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांनी काही दिवसापूर्वी शिव-शक्ती परिक्रमा यात्रा केली होती. यात त्यांनी शक्ती प्रदर्शन केले होते. त्यामुळे भाजपाचे हायकमांड त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. आता सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्यारुपाने सक्षम पर्याय मिळाला आहे. अर्थात कुटे उद्योग समुहावर आयकर विभागाने १० ऑक्टोबरला धाडी टाकल्या होत्या. तसेच ज्ञानराधा मल्टिस्टेटची देखील चाैकशी सुरु होती. त्यामुळे ज्ञानराधा मल्टिस्टेटमधून पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची झुंबड उडाली होती. हा ससेमिरा टाळण्यासाठीच कुटे दांपत्याने भाजपा प्रवेश केल्याची जोरदार चर्चा होत आहे. तसेच भाजपने कुटे यांना भाजपात घेत बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पर्याय निर्माण केला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उद्योजक सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ आहे. त्यांनी आपल्या उद्योग समुहातून हजारो तरूणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. तसेच महिलांसाठी त्यांनी पत्नी आणि समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकारानं त्यांच्या समूहात खास नोकऱ्यांची संधी निर्माण करून दिली आहे. त्यामुळे आगामी काळात कुटे यांना कोणती जबाबदारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.