Latest Marathi News

‘रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा’

लोकसभेच्या तिकिटवाटपावरुन शिंदे गटात गद्दारीची टिका, रामदास कदम गजानन कीर्तिकर यांच्यात आरोप प्रत्यारोप

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- ठाकरे शिंदे वादानंतर निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवला. पण आता शिंदे गटातील बेबनाव समोर येऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीला थोडा अवकाश असला तरीही आत्ताच शिंदे गटात वादाची ठिणगी पडू लागली आहे. अजून महायुतीचे जागा वाटप निश्चित झाले नसले तरीही शिंदे गटाच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर – पश्चिम मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. तर गजानन कीर्तीकर हे सुध्दा शिंदे गटाकडून उमेदवारी मागत आहेत. पण रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. कारण रामदास कदम हे या जागेवर आपले पुत्र सिद्धेश कदम यांच्यासाठी आग्रही आहेत. रामदास कदम म्हणाले की, “गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात आहे. फक्त लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरून घरी बसू नका. पक्षाशी बेईमानी होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्हाला विरोध करण्याचं कारण नाही. पण, एकाच कार्यालयात मुलगा आणि वडील बसतात. काय करताय हे सर्व जग पाहतेय. मुलगा ठाकरे गटातून तर तुम्ही शिंदे गटातून अर्ज दाखल कराल. नंतर मुलाला बिनविरोध निवडून द्यायचं, असं कटकारस्थान होता कामा नये. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, ही विनंती आहे,” असं रामदास कदमांनी म्हटले आहे. यावर एक परिपत्रक काढत गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांचा समाचार घेतला आहे. रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. १९९० साली मी मालाड विधानसभेतून निवडणुकीला उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम यांनी मला पाडण्यासाठी प्रयत्न केले. खेड-भरणा नाका ते भोर-पुणे शरद पवार यांच्‍या गाडीत बसून रामदास कदम राष्‍ट्रवादीत प्रवेश करण्‍याबाबत सविस्‍तर चर्चा करीत होते, हे त्‍यांनी विसरू नये आणि खेडमधील शिवसैनिक देखील हे विसरलेले नाहीत. अशा शब्दात कदम यांच्यावर पलटवार केला आहे. आता हा वाद शमवण्यासाठी एकनाथ शिंदे कोणती पावले उचलणार हे पहावे लागेल.

अनंत गीते यांना देखील २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीत पाडण्‍यासाठी रामदास कदम यांनी भरपूर मेहनत घेतली. परंतु, कोकणातील निष्‍ठावान शिवसैनिक गीतेंच्‍या पाठीशी उभे राहिल्यामुळे प्रचंड मताधिक्‍याने ते विजयी झाले,” असं कीर्तिकरांनी म्हटले आहे. त्यामुळे आता वाद कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!