मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- मुंबईतील घाटकोपरमध्ये बुधवारी एक विचित्र अपघात घडला. एका भरधाव कारने तीन वाहनांना धडक दिल्यामुळे सातजण जखमी झाले आहेत.हा अपघात सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. विशेष म्हणजे मोबाईल चार्ज करण्याच्या नादात हा अपघात घडला आहे.
या विचित्र अपघातात सात जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुधा पार्क परिसरात हा अपघात झाला. कामराज नगर परिसरात राहणारा राजू यादव नावाचा रिक्षाचालक त्याच्या मित्रासोबत कारमध्ये बसला होता. यावेळी मोबाइल चार्ज करण्यासाठी त्याने कारची चावी फिरवली पण ब्रेक टाकला नसल्यामुळे ती सुरू झाली. त्याने गडबडीत ब्रेकऐवजी एस्कलेटरवर पाय दिल्याने कारने वेग घेतला. त्यामुळे कार समोर उभ्या असणाऱ्या तीन रिक्षा आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला धडकली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही पादचाऱ्यांनाही या कारने धडक दिली. हा विचित्र अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पंतनगर पोलिसांनी कार चालक राजू यादवविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अपघातात आदित्य सनगरे, वैष्णवी काळे, राजेंद्र बिंद , सपना सनगरे, जयराम यादव, श्रध्दा सुशविरकर, आणि भरतभाई शहा अशी जखमींची नावे आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. चार्जिंगच्या हव्यासापोटी हा अपघात घडला आहे.