पत्नी व पुतण्याची हत्या करत सहायक पोलीस आयुक्तांची आत्महत्या
तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले, हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट, पोलीस दलात खळबळ
पुणे दि २४(प्रतिनिधी)- पुण्यात पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी आपल्या पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे. बालेवाडी परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार गायकवाड यांचे कुटुंब पुण्यातच राहत होते. तर भारत गायकवाड हे सुट्टीवर असल्याने पुण्यातील घरी आले होते. पण पहाटे अचानक त्यांनी आपली पत्नी आणि पुतण्याची स्वतः खाजगी बंदुकीतुन गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतः ही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. घटना घडली तेव्हा एसीपी भरत गायकवाड यांची आई आणि दोन मुलेही घरात होती. पहाटे गोळी झाडण्याचा आवाज ऐकताच त्यांनी खोलीकडे धाव घेतली. पण तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. पण घटनास्थळी कोणताही पुरावा आढळला नाही. त्यामुळे या हत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे. भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या करून आत्महत्या का केली याचा खुलासा आता तपासाअंती समोर येणार आहे.
सहाय्यक आयुक्तसारख्या वरिष्ठ पातळीवर काम करत असलेल्या अधिकाऱ्याने दुहेरी हत्येनंतर स्वत:ही आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी खासगी वापरासाठी पिस्तूल घेतले होते. ते जप्त करण्यात आले आहे. या संपुर्ण प्रकरणाचा तपास चतु:श्रृंगी पोलिस करत आहेत.