नाशिक दि २६(प्रतिनिधी)- नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात असलेल्या तेजस वडापावच्या गाडीवर टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खुन्नसने का बघतो म्हणून हल्ल्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून संशयित आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशाल गोसावी या वडापाव विक्रेत्यावर अज्ञातांनी कोयत्याने हल्ला केला. खुन्नसने का बघतो म्हणून विचारणा करत त्याला मारहाणही केली. तर तेजस गोसावी वडापाव गाडीवर मिळून न आल्याने त्याचे दाजी विशाल गोसावी यांना मारहाण करण्यात आली. तेजस गोसावी मिळाला नाही म्हणून नंतर त्याच्या घरी जाऊन दगडफेक केल्याचीही घटना समोर आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी झाली असा दावा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्यानंतर काही तास उलटत नाही तोच नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या आहेत.

नाशिकरोड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल होऊनही अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे, त्यात घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्याने कारवाईची मागणी केली जात आहे.नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.