
चहाचे पैसे मागितल्यामुळे कोयता घेऊन धमकावण्याचा प्रयत्न
व्हिडिओ व्हायरल, पुण्यातील कोयात गँगचा हैदोस सुरूच, पोलिसही हतबल?
पुणे – पुण्यात सध्या गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. खून बलात्कार याबरोबरच कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. आता कोयता घेऊन घरात घुसण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आंबेगाव पोलिसांनी काही दिवसापूर्वी कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांची धिंड काढली होती. पण तरीही कोयता गँगची दहशत संपण्याचे नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा कोयता गँगची दहशतीचा एका व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील दत्तनगर आंबेगाव परिसरातील एका घरा जवळ काही तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन उभे असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारती विद्यापीठ येथील त्रिमुर्ती चौकात चहाच्या टपरीवर भांडणे झाली होती. चहाच्या टपरीवर चहा पिल्यानंतर आरोपींनी पैसे का दिले नाहीत या कारणावरून हटकल्याने त्या व्यक्तीच्या घरात जाऊन तिघाजणांकडून कोयत्याने धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता कोयता गँगची रस्त्यावरील दहशत घरापर्यंत आल्याने नागरिक मात्र भयभीत झाले आहेत.
पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ड्रग्ज प्रकरण, कोयता गँग, स्थानिक गुंडांच्या टोळ्या आणि अत्याचाराच्या घटनांनी पुणे शहर बदनाम होत आहे.