
वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपाच्या या मंत्र्याचा राजीनामा
भेदभाव करणारे ते विधान भोवले. राजीनामा देताना अश्रू अनावर, म्हणाले माझ्या विधानाचा...
देहराडून – उत्तराखंडचे अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते प्रेमचंद अग्रवाल यांनी ‘मैदानी विरुद्ध पहाडी’ या विषयावर बोलताना शुक्रवारी विधानसभेत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर फासलेल्या असंतोषामुळे त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
प्रेमचंद अग्रवाल यांनी रविवारी दुपारी यमुना कॉलनीतील त्यांच्या सरकारी निवासस्थानातून राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना राजीनामा देण्यासाठी पोहोचले. ते म्हणाले- मी आंदोलनकर्ता आहे. आज मला स्वतःला सिद्ध करावे लागतेय. मी राज्य चळवळीत सक्रिय भूमिका बजावली आहे. माझ्या विधानाचा विपर्यास करून ते ज्या पद्धतीने सादर करण्यात आले त्यामुळे मी दुखावलो आहे. मुख्यमंत्री धामी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार खूप चांगले काम करत आहे. ज्याप्रमाणे उत्तराखंड पंतप्रधान मोदींच्या हृदयात राहतो, त्याचप्रमाणे मोदी आपल्या हृदयात राहतात. माझ्या भावना अजिबात चुकीच्या नव्हत्या, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान फेब्रुवारी मध्ये त्यांनी दिलेल्या वादग्रस्त विधानामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला होता. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात माफी मागण्याची मागणी केली. प्रेमचंद अग्रवाल यांनीही सभागृहातील वाढत्या वादाबद्दल दु:ख व्यक्त केले होते. तथापि, वाद थांबण्याऐवजी वाढतच गेला. पर्वत आणि मैदानाचा मुद्दा राज्यभर तापला. राज्यभरात प्रेमचंद अग्रवाल यांचे पुतळेही जाळण्यात आले. त्यामुळे मंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
उत्तराखंड विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी प्रेमचंद अग्रवाल आणि विरोधी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. यावेळी अग्रवाल यांनी हे राज्य डोंगराळ (पहाडी) लोकांसाठीच बनवलं आहे का? असा सवाल केला होता. त्यांच्या या विधानावरून सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला होता.