
हडपसर जवळील हांडेवाडी परिसरात एका सोसायटीत ४ वर्षांच्या चिमुकल्या मुलीला विचारल्याशिवाय गाडीत बसवून नेणाऱ्या व्यक्तीला जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलीला कुठे नेताय, असे विचारले असता आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने तरुणाला आणि त्याच्या भावाला सोसायटीच्या गेटवरच पट्ट्याने आणि काठीने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश पांडुरंग गायकवाड (२७) यांची ४ वर्षांची भाची गार्गी २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत होती. खेळता खेळता ती अचानक बेपत्ता झाल्याने गणेश यांनी तिचा शोध घेतला. शोध घेत असताना ती सोसायटीतीलच शुभम बाचकर याच्या गाडीत बसलेली आढळली. त्याच्यासोबत शेजारील दुसरी एक मुलगीही होती. शुभम हा या दोन्ही चिमुकल्या मुलींना घेऊन गेटच्या दिशेने जात असल्याचे पाहून गणेश यांनी तातडीने गाडी अडवली.

आईस्क्रीमचं कारण अन् दारूची नशा
गणेश यांनी “मुलींना न विचारता कुठे नेतोय?” असे विचारले असता, शुभमने त्यांना “आईस्क्रीम खायला नेतोय” असे सांगितले. मात्र, शुभम हा दारूच्या नशेत असल्याचे गणेश यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला हटकले असता वादाला सुरुवात झाली. शुभमने शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि काही वेळातच तिथे त्याचे मित्र आले.
टोळक्याकडून अमानुष मारहाण
वाद सुरू असताना शुभमची बाजू घेत किरण पवार, श्रावण मोडक आणि एका अनोळखी इसमाने गणेश यांच्यावर हल्ला चढवला. श्रावण मोडक याने कमरेच्या पट्ट्याने गणेश यांना मारले, तर अनोळखी इसमाने वॉचमनची काठी आणि टेबलवरील छत्रीच्या पाईपने त्यांना बेदम बदडले. मध्यस्थी करणाऱ्या गणेश यांच्या भावालाही खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
पोलिसांत गुन्हा दाखल
मारहाणीनंतर आरोपींनी “तुम्हाला बघून घेऊ” अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. गणेश गायकवाड यांनी तातडीने १०० नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिली. उपचारांनंतर गणेश यांनी दिलेल्या जबाबावरून फुरसुंगी पोलिसांनी शुभम बाचकर, किरण पवार, श्रावण मोडक आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

